लोककला

कोकणातील पारंपारिक लोककला



        कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातले खरे खुरे उत्सव. या दोन्ही उत्सवासाठी इथला शेतकरी मोकळा असतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी / मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात. कोकणातल्या या दोन्ही सणांशी इथल्या लोककला निगडीत आहेत.

        जाखडी हा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे. गणेशोत्सवात गावातल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो. या नाचाला पूर्वी बाल्या नाच म्हणत. आठ गडी फेर धरुन वादकांच्या भोवती नाचतात. ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो. जाखडीत आता अनेक बदल झालेत. वेशभूषा, प्रकाशयोजना आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे. जाखडीचा सामना ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते.

        रत्नागिरी पासून गोव्यापर्यंत आता जाखडीची जागा भजनाने घेतली आहे. कोकणातली भजनकलाही आता आधुनिक बनली आहे. भजनाच्या बाऱ्या हा संगीत आणि विनोदाचा अफलातून मेळ असतो. त्याचा अनुभव शब्दात सांगतच येणार नाही.

        दसऱ्यानंतर जाखडीतली ढोलकी खुंटीवर अडकून पडते. तिच्यावरची धूळ झटकली जाते ती फाल्गुन महिन्यातील पंचमीला. शिमग्याचा सण खास ग्रामदेवतांसाठी असतो. त्यांच्या पालख्या आणि पालख्यांसोबत नाचणारे खेळे हे शिमग्याचं नेहमीचं चित्र. खेळे आणि नमन हे एकाच कुळातील नाट्य नृत्य प्रकार आहेत. खेळ्यांचे नानाविध प्रकार आहेत. दर गावामागे खेळ्यांचे आणि त्यातील सोंगांचे ढंग बलत जातात. त्यात मुख्य असतात संकासूर आणि राधाकृष्ण. त्यांच्या सोबतीला सोंगे घेतलेले अनेक प्राणी, देवदेवता, यक्ष, दानव, इ. त्यांचे पूर्वापार लाकडी मुखवटे आणि नृत्याचे पदन्यास हे प्रत्यक्ष पहावेच लागतील.

        पालखी नाचवणे हा नृत्याचा एक अभिनव प्रकार फक्त कोकणातच पहायला मिळतो. पालख्या नाचवण्यात रत्नागिरीची खास ओळख आहे. होळी आणि गणेशोत्सवाने जाखडी, नमन, खेळे, भजन आणि पालखी नृत्य या लोककला घट्ट धरुन ठेवल्या आहेत. त्याच कोकणाचा सांस्कृतिक वारसा आहेत.